Categories: Uncategorized

नेरूळ पश्चिमच्या भाजपच्या गडाला पालिका निवडणूकीत खिंडार पडणार ?

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या विळख्यातून नवी मुंबई शहराची मुक्तता होवू लागली असून कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाणही अगदी  दोन आकडी संख्याबळावर आले आहे. बिहार राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका कोरोना काळातच यशस्वीपणे पार पाडल्यानंतर महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकांमध्ये मागच्या सभागृहातील सत्ताधारी भाजपा विरोधात महाविकास आघाडी अशी  तुल्यबळ लढत  होणार आहे. नेरूळ पश्चिममध्ये असलेल्या आठ प्रभागामधील भाजपाच्या प्रभावाला खिंडार पडणार असून भाजपाचे आठ प्रभागातून जेमतेम दोन नगरसेवक निवडणूक येण्याची शक्यता  राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

नेरूळ पश्चिमला असलेल्या आठ प्रभागामध्ये पाच भाजपाचे, तीन  शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सौ.जयश्री ठाकूर,  सौ. सुजाता पाटील, सौ. रूपाली भगत, सौ. श्रध्दा गवस, गिरीश म्हात्रे हे भाजपाचे पाच  नगरसेवक तर सौ. सुनिता मांडवे, नामदेव भगत, काशिनाथ  पवार हे शिवसेनेचे तीन नगरसेवक मागच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आले होते.  सौ. जयश्री ठाकूर, सौ. सुजाता  पाटील, सौ. रूपाली भगत, गिरीश म्हात्रे हे सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.  तर श्रध्दा  गवस या अपक्ष म्हणून निवडून  आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची  वाट  धरली. लोकनेते गणेश नाईक  यांच्या भाजपा प्रवेशानंतर सौ.जयश्री ठाकूर,  सौ. सुजाता पाटील, सौ. रूपाली भगत, सौ. श्रध्दा गवस, गिरीश म्हात्रे या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ‘रामराम’ ठोकत भाजपमध्ये प्रवेश  केला  होता. आठ प्रभागांपैकी ५ भाजपचे तर  ३ शिवसेनेचे असे मागील विर्सजित सभागृहात नेरूळ पश्चिमचे चित्र  असले तरी  भाजपच्या ५ प्रभागांमधील ३ प्रभागांमध्ये भाजपा अंतर्गत मतभेद, इतरांच्या प्रभागात निवडणूक लढविण्याची काही बोनकोडे समर्थकांची महत्वाकांक्षा तसेच महाविकास आघाडीच्या छत्राखाली विरोधकांनी मारलेली मुसंडी पाहता भाजपाला ३ प्रभागामध्ये पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात  आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या प्रभागात बदललेली समीकरणे पाहता भाजपाला अनुकूल  वातावरण  निर्माण झाले असून शिवसेनेला एक जागा गमवावी लागणार असल्याची  चर्चा  सुरू आहे.

मागील सभागृहात असलेल्या सौ. जयश्री ठाकूर  या एसटी या आरक्षित प्रभागातून निवडून आल्या होत्या.  आता तो प्रभाग ओबीसी आरक्षित झाल्याने भाजपाला या  जागेवर नव्याने उमेदवार  उभा करावा  लागणार आहे. याच  प्रभागातील डोकेदुखी भाजपला सभोवतालच्या दोन ते तीन प्रभागासाठी होणार आहे. महाविकास आघाडीकडून  ही जागा  शिवसेनेला सोडण्यात आल्याचे निश्चित असले तरी या ठिकाणी बाहेरच्या प्रभागातील शिवसेनेचा  मातब्बर येथून निवडणूक लढणार  असल्याचे निश्चित मानले जात आहे.  त्यामुळे शिवसेनेकडून निवडणूक लढण्यासाठी गेली काही वर्षे मोर्चेबांधणी करणाऱ्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाले आहे.

 सौ. सुजाता पाटील या नगरसेविका असलेल्या प्रभागात भाजपाकडून अन्य उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाविकास आघाडीकडून या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महादेव पवार यांचे  तिकिट जवळपास निश्चित झाल्यातच जमा आहे. भाजपाकडून विद्यमान नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांचे तिकिट भाजपाने कायम ठेवल्यास महाविकास आघाडीची येथे फारशी डाळ शिजणार नाही. तथापि सौ. सुजाता पाटील यांना डावलून भाजपाने अन्य कोणाला निवडणूक रिंगणात उतरविल्यास कॉलनी भागातील अधिकाधिक मतदान व  राष्ट्रवादीच्या महादेव पवारांचा कॉलनीतील घरटी जनसंपर्क पाहता महादेव पवार हे या प्रभागातून ‘ना. गणप्या गावडे’ ठरण्याची  शक्यता  मानली जात आहे.

सौ. सुनिता मांडवे या  नगरसेविका असलेला प्रभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अर्थात  यामागे मांडवे परिवाराचे असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. या प्रभागातून सुनिता  मांडवे अथवा त्यांचे यजमान असलेले माजी नगरसेवक रतन मांडवे या दोघांपैकी कोणा एकाचे  तिकिट महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित आहे. भाजपकडून गणेश  रसाळांचा  निवडणूक रिंगणातील सहभाग निश्चित मानला जात आहे. या प्रभागात मांडवे पर्यायाने शिवसेनेचा  विजय जवळपास निश्चित समजला जात आहे.

श्रध्दा गवस यांचा प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपातीलच अन्य घटक जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याने भाजप या प्रभागात दुंभगली जाणार असल्याचे चित्र  आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश भोर,  कॉंग्रेसकडून  नवनाथ  चव्हाण  इच्छूक असले तरी महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेच्या कोट्यात व तेथून उपजिल्हाप्रमुख असलेले या  प्रभागातील माजी नगरसेवक दिलीपभाऊ  घोडेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.  परिवहन समितीचे माजी सभापती प्रदीप गवस हे भाजपा नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय समर्थक असून नारायण राणे हे गवस यांचे तिकिट कापू  देणार नसल्याचा दावा गवस समर्थकांकडून केला जात आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर गवस यांनी शिवसेना शाखाप्रमुखपदाचा  राजीनामा देत राणेंचे जाहिरपणे समर्थन  केले होते. याशिवाय गवस  परिवाराची इथापे, सुतार परिवाराची वाढती राजकीय जवळीक पाहता गवस यांचे तिकिट कापून स्वत: निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहणाऱ्याचे मनसुबे यावेळी यशस्वी ठरणार नसल्याचे बोलले जात आहे. याच  प्रभागातून पालिका निवडणूक लढविण्यासाठी मनसेचा एक दिग्गज  नेता इच्छूक असून त्यादृष्टीने चाचपणीही मनसेच्या नेत्याने सुरू केली आहे. तथापि या प्रभागातील माती व जातीची पालिका निवडणूकीतील आजवरची समीकरणे पाहता  मनसेच्या निवडणूक लढवू पाहणाऱ्या नेत्याने मागील अनेक वर्षात नवी मुंबईत कमविलेली राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची शक्यता असून ठाण्यातील मनसेच्या एका गटाला आयते कोलित उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सौ. रूपाली किसमत भगत यांच्या प्रभागातून भाजपातून जनसेवक गणेश भगत हे पालिका निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले असून गणेश भगत हे लोकनेते गणेश नाईकांवर बेफाम प्रेम असणारे एक समर्थक अशी नवी मुंबईत त्यांची राजकीय ओळख आहे. या प्रभागातून शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झाले आहे. कोरोना पर्वापूर्वी या प्रभागात शिवसेना कमालीची  बॅकफूटवर होती. तथापि कोरोना काळात गणेश भगतांच्या तोडीस तोड कार्य करण्याचा प्रयत्न करताना विजय  माने यांनी राजकीय पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.  या प्रभागात गणेश भगत यांना पक्ष म्हणून नाही तर माणूस म्हणून मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने तो भाजपसाठी प्लस पॉईट ठरणार आहे. गणेश भगतांचा या प्रभागात व्यक्तिगत जनसंपर्क चांगला आहे. शिवसेनेत या ठिकाणी  असलेली गटबाजीही भाजपच्या पथ्यावर या प्रभागात पडणार आहे. गणेश भगत आणि विजय माने यांच्यातील लढत  चुरशीची व लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत, काशिनाथ पवार आणि भाजपचे नगरसेवक  गिरीश म्हात्रे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने सौ. इंदूमती भगत, सौ. आशा पवार आणि सौ. मोनिका गिरीश  म्हात्रे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सौ. इंदूमती भगत या तीन वेळा महापालिका सभागृहात नगरसेविका होत्या. त्यांच्याविरोधात भाजपकडून गोपीनाथ ठाकूर यांच्या कन्या सौ. प्रिति चंद्रशेखर भोपी यांची  उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांना म्हात्रे व पाटील या भाजपमधील नेतेमंडळींची निवडणुक काळात पडद्यावर व पडद्याआडून कितपत मनापासून साथ मिळणार यावरच त्यांची वाटचाल अवलंबून राहणार आहे.  सौ. मोनिका गिरीश म्हात्रे या राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांचे यजमान गिरीश म्हात्रे हे मागील महापालिका निवडणूक नेरूळ पश्चिमला जायंट किलर ठरले होते हे विसरून चालणार नाही. या प्रभागातील काही बोनकोडे समर्थकांच्या पडद्याआडच्या हालचाली मोनिका म्हात्रे यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडीकडून नेरूळ गावातील एका  तगड्या मातब्बराची  चाचपणी सुरू असल्याने गिरीश म्हात्रेंना आपला गड  राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. प्रभाग ९७ हा महिला आरक्षित झाल्याने महाविकास आघाडीकडून सौ. आशा पवार आणि भाजपकडून सौ. उल्का तिकोणे यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.नेरूळ पश्चिममध्ये भाजपाची कागदोपत्री हवा असली तरी अंर्तगत मतभेद व  गटबाजीमुळे प्रत्यक्षात भाजपा गेल्या तीन-चार महिन्यात कमालीची बॅकफूटवर जावू लागली आहे.  ऐरोलीच्या भाजपा समर्थकांकडून तिकिट वाटपात आम्हीच बाजी मारणार, बेलापुरचे काही चालणार नाही अशी खुलेआमपणे केल्या जाणाऱ्या दर्पोक्तीवर व हालचालीवर बेलापुरच्या गढीतील मंडळी बारीक लक्ष ठेवून आहेत. आपण काम करत राहा, बाकी मी आहे हा बेलापुरच्या गढीतून दिलासा मिळाल्याने बेलापुर समर्थक  असणाऱ्या मंडळींचा उत्साह दुणावला असून त्यांनी आतून जोरदार काम सुरू केले आहे. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद व  गटबाजीत विखुरलेली नेरूळमधील भाजपा यामुळे नेरूळ पश्चिमला महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारणार असल्याचे चित्र आताच  निर्माण झाले आहे. भाजपच्या तीन जागांवर धोक्याची टांगती  तलवार असली तरी एका जागेवर शिवसेनेच्या प्रस्थापिताला धोका असून तिथे भाजपचा नवखा उमेदवार मुसंडी मारण्याची शक्यता  आहे. नेरूळ पश्चिमला महाविकास आघाडीच्या यशाला भाजपमधील स्थानिक मतभेद, मलाच मोठेपणा द्या ही वाढीस लागलेली वृत्ती नेरूळ पश्चिममध्ये भाजपच्या राजकीय अध:पतनाला हातभार लावणार असल्याचे बोलले जात आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago