Categories: Uncategorized

नव्याने कात टाकणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस

नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांसह  माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह नाईक परिवाराचे समर्थक असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील जवळपास अर्धशतकाच्या जवळपास असणाऱ्या संख्येने नगरसेवकांनी विधानसभा  सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  हे कधी ना कधी घडणारच होते. नाईकांच्या भाजपा प्रवेशाचे आडाखे राजकारणात आज नाही तर मागील विधानसभा निवडणूकीपासून सुरूच होते.पाच-सहा वर्षे चर्चेचे गुऱ्हाळ रंगल्यावर अखेर नाईकांचा भाजपात प्रवेश झाला. नाईक भाजपामध्ये कधीही जाणार नाहीत व शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाहीत असाही मतप्रवाह असणारा वर्ग ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर होता. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी मुंबईचे पार्टीबाबतचे सर्वाधिकार नाईक परिवाराला दिले होते. खासदारकी, आमदारकी, महापौर, महापालिका निवडणूकीतील तिकिटवाटप, पार्टी  पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीचे स्वातंत्र्य सर्व काही नाईक परिवाराच्या अखत्यारीत असताना नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसला विशेषत: शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना सोडून जाणार नाहीत अशी प्रभावी चर्चा ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने केली जात होती. पण राजकारणात कधी कोणत्या घडामोडी  घडतील याची शाश्वती स्वर्गलोकीचे तेहतीस कोटी देवही देवू शकणार नाहीत. सकाळी जावून अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी घेतील, शिवसेना ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्तासंपादन करेल हे पूर्वी कोणी सांगितले असते तर त्याला नक्कीच कोणीही मुर्खात काढले असते. पण आता अशक्य गोष्टीही महाराष्ट्राच्या राजकारणात होवू लागल्या आहेत. यापूर्वी अशा घडामोडी उत्तरप्रदेश, गोवा, गुजरात, केरळ व कर्नाटक राज्यात घडत होत्या, आता त्या राज्याच्या यादीत आपल्या महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे.

गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक व अर्धशतकीय संख्याबळ असणारे नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईत पुढे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. इतकी मातब्बर फौज निघून  गेल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस  पार्टी खिळखिळी होणे स्वाभाविकच होते. त्यातच अवघ्या काही दिवसातच नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसला  विधानसभा निवडणूकीचा सामना  करावा लागला.  ऐरोली, बेलापुर या दोन विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविल्या. नाईक समर्थक व नाईक परिवार भाजपात गेला असला तरी शरद पवारांना मानणारा समर्थक  वर्ग नवी मुंबईत काही प्रमाणावर होता.  त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बिगुल वाजविणारी मंडळी  एकत्र आली. निवडणूकीकरिता मोर्चेबांधणी  सुरू झाली. अशोक  गावडे, दिलीप बोऱ्हाडे, भालचंद्र नलावडे, रोहिणी घाडगे, सपना  गावडे, जी.एस.पाटील, राजेश भोर यासह अनेक मंडळी एकत्र आली. माथाडी नेते शशिकांत शिंदेंचे मार्गदर्शन सोबतीला होतेच. पवारांना मानणारा पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईतील मतदार व नवी मुंबईतील माथाडी वर्ग शरद पवारांची साथ सोडणार नाही हे स्पष्ट असल्याने  नवी मुंबईतून राष्ट्रवादी कॉंग्रेस संपणे शक्य नसल्याचे वादळी पडझडीनंतर काही दिवसातच स्पष्ट झाले. पडझडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने संघटना बांधणीसाठी वेळही मिळाला नाही, लगेचच विधानसभा निवडणूकीला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी मुंबईची धुरा शरद पवारांनी आपल्या अनेक वर्षापासून सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या अशोक गावडेंसारख्या निष्ठावंत समर्थकावर सोपविली. अशोक गावडेंनीदेखील या विश्वासाला तडा जाणार नाही याची  सतत काळजी  घेतली  आहे.

विधानसभा निवडणूकीत  ऐरोली व बेलापुर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाला. पण बेलापुरातून अशोक गावडेना ४५ हजाराहून अधिक झालेले मतदान  व  ऐरोलीतून गणेश शिंदेंना झालेले जवळपास ३० हजार मतदान पाहिल्यावर नवी मुंबईतील नेतेमंडळी भाजपात गेली,  पण अजूनही काही प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधार असल्याचे मतपेटीतून  स्पष्ट  झाले. हा  मतपेटीतील जनाधार पाहिल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिलेदारांचा उत्साह दुणावला. महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभागाप्रभागातील शिलेदारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  कार्यक्रम  सुरू आहेत.

विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी नवी मुंबईतील विकासांच्या मुद्यांवर महापालिका व  मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा  सुरू केल्याने अन्य पक्षातील प्रस्थापितांचे धाबे  दणाणल्याचे पहावयास मिळत  आहे. आजवर ज्या प्रश्नांना  कधी चालना मिळाली नाही, प्रस्थापित नेतेमंडळींनी कानाडोळा केला,  त्याच प्रश्नांसाठी  अशोक गावडेंनी पाठपुरावा सुरू केल्याने अशोक गावडे पर्यायाने शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, आपल्या सोबत आहे हा विश्वास अशोक गावडेंच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये निर्माण झाला.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरावर महापालिकेने  व सिडकोने कारवाई करू नये, धोरणात्मक निर्णयाची  वाट पाहावी यासाठी अशोक गावडे सातत्याने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा  करत आहेत. ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या साडे बारा टक्के भुखंडातून सामाजिक कामासाठी पावणे चार टक्के वजावट करून  घेतले आहेत. आज नवी मुंबईतील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. रोजगार नाही, भूसंपादनात भातशेती गेली, राहत्या घरावर हातोडा पडून बेघर होण्याची भीती यामुळे  त्या पावणे चार टक्केचा मोबदला नवी मुंबईच्या ग्रामस्थांना मिळावा  यासाठीही अशोक गावडेंनी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. सागरी सुरक्षेबाबत आग्रही राहताना सागरी सुरक्षा रक्षकांना  भेडसावणाऱ्या असुविधा व समस्यांही अशोक  गावडे यांनी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहे. कोरोना काळात कोरोना  रूग्णांची माहिती महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना मोबाईल वर पाठविली जात होती. परंतु आता पाठविली जात नसल्याने सोसायटीतील रहीवाशांना सोसायटीतील कोरोना  रूग्णाबाबत माहिती होत नसल्याने निर्माण होत असलेल्या सोसायटी आवारातील समस्या अशोक गावडे यांनी सतत निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.  पूर्वीप्रमाणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मोबाईलवर सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी अशोक गावडे गेल्या दोन महिन्यापासून पालिका  आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा  करत आहेत.  स्वच्छ भारत मिशनमध्ये गावठाणाच्या विकासाला  व  गावातील समस्या  निवारणाला  प्राधान्य देण्यासाठी  अशोक गावडेंनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक गावडे यांनी नवी मुंबईतील अनेक  प्रश्नांना  सोडविण्यासाठी मंत्रालयीन  व  महापालिका पातळीवर चालना  देण्यास सुरूवात केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत जनसामान्यात विशेषत: नवी मुंबईतील ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मार्केट आवारात अशोक गावडेंचे प्रस्थ आहे. नवी मुंबईतील माथाडी वर्गावर माथाडी नेते शशिकांत शिंदेंचा कमालीचा प्रभाव आहे. नितीन  चव्हाणसारखे युवा नेतृत्व इतर युवा सहकाऱ्यांच्या मदतीने विविध कामातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा  नावलौकीक वाढवित आहे. कोपरखैराणे, ऐरोली, घणसोली भागावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशेष लक्ष केंद्रीत केल्यामुळे पालिका निवडणूकीत  महाविकास आघाडीत भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस महत्वाची भूमिका बजावणार असल्याची नवी मुंबईकरांमध्ये चर्चा  सुरू झाली आहे. तुर्भे,  सानपाडा, जुईनगर, नेरूळ पश्चिम,  सिवूडस  भागातील रहीवाशांमध्ये शरद पवारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठराविक  भागावर प्राधान्याने लक्ष देण्यास  सुरूवात केल्यामुळे महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच कंबर कसून सुरूवात केल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. पडझडीनंतर कात टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेसने  वाटचाल सुरू  केली  आहे. शशिकांत शिंदे व अशोक गावडेंसारखी  मातब्बर जोडगोळी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी कार्यरत असल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुगीचे दिवस  येण्यास  फारसा  वेळ  लागणार नाही.

  • सुवर्णा खांडगेपाटील
  • संपादक
  • नवी मुंबई लाईव्ह. कॉम
  • ९८२००९६५७३
NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system