Categories: Uncategorized

कोरोना काळातील खराखुरा लढवय्या

गणेश नाईक आणि नवी मुंबई या शहराचा परस्परांशी एक आगळावेगळा असा संबंध आहे. जसे ध्रुव बाळाचे ताऱ्याच्या माध्यमातून एक अढळ स्थान निर्माण झाले. तसेच नवी मुंबई आणि गणेश नाईक यांचे एकमेकांशी असलेले नाते व गेल्या चार दशकाहून अधिक काळाचा मिलाफ असे हे समीकरण  आहे. याच गणेश नाईकांना दादा, साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते या नावानेही संबोधले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईकांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही स्वत:चे एक आगळेवेगळे असे स्थान निर्माण केले आहे. ठाणे जिल्ह्याचे अनेक वर्षे पालकमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. अनेक वर्षे मंत्रीपदावर राहून विविध खात्यांचा कारभार गणेश नाईकांनी यशस्वीपणे हाकताना  त्या त्या खात्याच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या तळागाळातील जनतेला  नेहमीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न  केलेला आहे. गणेश नाईकांनी अनेक गोष्टी स्वत: सुरू केल्या, त्यानंतर  अनेकांनी त्याचे अनुकरण केले. त्यामुळे गणेश नाईकांनी रूळलेल्या वाटेवरून इतरांप्रमाणे प्रवास न करता स्वत:ची स्वतंत्र अशी वाट  निर्माण करून त्या वाटेवरून येण्यास  इतरांना भाग पाडले असे म्हणणेदेखील अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ या उक्तीप्रमाणे गणेश नाईक महाराष्ट्र राज्य पादाक्रांत करत असताना त्यांनी आपल्या कर्मभूमीकडे म्हणजेच या नवी मुंबई शहराकडे त्यांनी कधीही कानाडोळा केलेला नाही आणि त्यांच्या शरीरात अखेरचा श्वास असेपर्यत ते पोटच्या मुलांप्रमाणे नवी मुंबई शहराला जपणार, याची प्रत्येक नवी मुंबईकराला खात्री आहे. नवी मुंबईतील पर्यायाने ठाणे जिल्ह्यातील जनतेला प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळावा, त्यांच्या समस्येचे भिजत घोंगडे राहू नये यासाठी लोकनेते गणेश नाईकांनी जनता दरबार सुरु केला.  अनेकांनी सुरूवातीला या जनता दरबाराला उपहासाने उल्लेखिले, परंतु नंतर अनेकांनी याच जनता दरबाराचे अनुकरण करत स्वत:च्या विभागात जनता दरबार सुरू करत एकप्रकारे लोकनेते गणेश नाईकांच्याच भूमिकेचे अनुकरण  केले.

कोरोनासारख्या जागतिक महामारीने सर्व जग हादरून गेले. राजाचा अचानक एका वादळात रंक व्हावा तशी परिस्थिती जागतिक अर्थकारणाची झाली. कोरोनामुळे जणू काही काळ जगच ठप्प झाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे होत्याचे नव्हते होवून बसले. हिरव्यागार नंदनवनाचे अचानक वाळवंटात रूपांतर झाले. माणसांच्या गर्दीने बहरलेल्या एमआयडीसी परिसरातही कंपन्या-कारखाने बंद पडल्याने स्मशान शांतता पसरली. मार्केट, बाजारपेठा ओस पडल्या. शहरांमधील गर्दी कमी होवून गावाकडे वर्दळ वाढली. अनेक शहरामध्ये रूग्णांना कोरोनावर सुविधाही मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या होत्या. जगात कोरोनाचा आगडोंब उसळलेला असताना नवी मुंबई शहर आणि नवी मुंबईकर मात्र निर्धास्त होते. उलट नवी मुंबईकरांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक धोक्याची टांगती तलवार  होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ठाणे-उरण, पनवेल-मुंबईकडची वर्दळ पाहता कोरोनाच्या उद्रेकासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण नवी मुंबईतच होते. नवी मुंबईतही मार्चपासून कोरोनाचे पडसाद उमटू लागले होते. नवी मुंबईकर नवी मुंबईत झालेल्या कोरोनाच्या शिरकाव्यामुळे आणि जगात सुरू कोरोनाच्या उद्रेकामुळे काही प्रमाणात नक्कीच चिंताग्रस्त झाले होते, परंतु भयभीत मात्र झाले नव्हते. कारण त्यांचा गणेश नाईक या नावावर, या नावाच्या कर्तृत्वावर, या नावाचे नवी मुंबई शहरावर आणि या  शहरातील नवी मुंबईकरांवर असलेल्या प्रेमावर विश्वास होता. सत्तरी उलटलेले लढवय्या प्रवृत्तीचे गणेश नाईक कोरोनाविरोधात रस्त्यावर उतरले. नवी मुंबई सामाजिक व राजकीय क्षेत्रातून नवी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे गणेश नाईक हे पहिले राजकीय नेतृत्व होते. कोरोना काळात अनेक चमकेश घटकांनी वीतभर कामाचा हातभर गवगवा करून प्रसिध्दीची आपली हौस भागवून घेतल्याचे नवी मुंबईकरांनी या कोरोना काळात जवळून पाहिले होते आणि अनुभवलेही होते. परंतु इतरांच्या कामात आणि लोकनेते गणेश नाईकांच्या कामात जमिन आसमानचा फरक आहे तो याचमुळे. चिमणी तिच्या कुवतीप्रमाणेच उडणार व चिवचिवाट करणार, मात्र गरूडाला भरारी मारावीच लागते. आकाशाला गवसणी घालण्यासाठी गरूड भरारीच लागते आणि लोकनेते गणेश नाईकांच्या कुवतीवर आणि गरूडभरारीवर नवी मुंबईकरांचा विश्वास असल्यामुळेच नवी मुंबईकर कोरोना चारशे-पाचशेचा  आकडा गाठत असतानाही सर्वसामान्य तळागाळातील नवी मुंबईकर निर्धास्त होता.

लोकनेते गणेश नाईकांची महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू राजकारणी ही प्रतिमा आहे. शंकराला भोळा सांब म्हटले जाते, लोकनेते गणेश नाईकांनाही राजकारणात एक साधा भोळा राजकारणी म्हणूनच  ओळखले जाते. त्यांनी राजकारणाला नाही तर जनसेवेला, समाजकारणाला प्राधान्य देत आपल्या आजवरच्या उभ्या हयातीत व्यवहार कधी पाहिला नाही. लोकनेते गणेश नाईकांनी एका संवेदनशील माणसाप्रमाणे भावनेला महत्व दिले आणि त्यातूनच माणसाचा गोतावळा वाढत गेला. एकादा कट्टर, कडवट राजकीय विरोधक जरी काम घेवून समोर आला तरी लोकनेते गणेश नाईकांनी तात्काळ काम करून दिल्याचे जनता दरबारातील अनेक उदाहरणामध्ये ठाणे जिल्ह्यात अनेकांनी जवळून पाहिले आहे. कोरोना काळात लोकांचे अर्थकारण थांबणार, पगार विलंबाने होणार अथवा रोजगारही जाणार हे लोकनेते गणेश नाईकांनी दूरदृष्टीने पहिलेच जाणले होते. सर्वसामान्याची पहिली लढाई असते ती पोटासाठीच. पोटभर असले तरच तो जगेल आणि कोरोनाविरोधात झुंजेल हे ओळखून लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्वसामान्य गरीब व गरजूला धान्य कसे मिळेल याची सर्वप्रथम  व्यवस्था केली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी व सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी माजी नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. कोठे धुरीकरण, कोठे जंतुनाशक फवारणी तर कोठे मास्क वाटप सातत्याने कार्यक्रम भाजपच्या वतीने गणेश नाईकांनी सुरूच ठेवले.

कोरोनाला आटोक्यात आणायचे असेल तर प्रशासनाशी सुसंवाद हा ठेवावाच  लागेल. लोकनेते गणेश नाईकांनी महापालिका मुख्यालयात आपला वावर वाढविला. आठवड्यातून एकदा पालिका आयुक्तांना भेटून नवी मुंबईकरांना जाणवणाऱ्या कोरोना समस्या पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रशासन नवी मुंबईकरांसाठी काय करत आहे हे जाणून घेतले. सुरूवातीला गणेश नाईक व  पालिका मुख्यालयातील भेटी याबाबत कुजबुज करणाऱ्यांनी त्यानंतर गणेश नाईकांच्याच भूमिकेचे अनुकरण करत पालिका आयुक्तांच्या भेटीगाठी सुरू करत पालिका मुख्यालयाचे उंबरठे झिजविण्यास सुरूवात केली. कोरोना रूग्णांची वाढती संख्या, रूग्णालयीन उपलब्धता याचा सतत आढावा घेण्याचे काम कोरोना काळात मार्च महिन्यापासून लोकनेते गणेश नाईकांनी सुरू केलेले कार्य आजही सुरूच आहे. ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेटिंलेटर्स, आयसीयू याचाही आढावा घेतला. गणेश नाईकांच्या सोबतीला भाजपामधील तरूण तुर्काची फळी होतीच. केवळ पालिका आयुक्तांना भेटून चर्चा करून लोकनेते गणेश नाईकांनी समाधान मानले नाही तर रूग्णालयांमध्ये जावून रूग्णालयीन तयारीची खातरजमा करून घेतली. अन्य राजकारणी कोरोनावरील उपचारासाठी बनविण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनाचा मुद्दा एकीकडे प्रतिष्ठेचा  बनवित असतानाच दुसरीकडे लोकनेते गणेश नाईक हे उद्घाटनापूर्वीच कोव्हिड सेंटरचा आढावा घेवून त्यात कोठे कमतरता  तर नाही ना याची खातरजमा करून घेत होते.

आज कोरोना नवी मुंबई शहरामध्ये आटोक्यात येत चालला आहे. पाचशेची खेळी करणारा कोरोनाला आता डबल सेंच्युरीही गेल्या काही दिवसापासून मारता आलेली नाही. पालिका प्रशासन सतर्क आहे. पण सत्तरी उलटलेले लोकनेते गणेश नाईक मात्र कोरोना काळात नवी मुंबई शहर व येथे राहणारा सर्वसामान्य तळागाळातील नवी मुंबईकर माझा श्वास आहे आणि तो मला जपावाच  लागेल हे उभ्या महाराष्ट्राला आपल्या कृतीतून दाखवून देत होते. कोरोना उसळी मारत होता. नवी मुंबईत कोरोना वाढीला पोषक वातावरण होते. परंतु सत्तरीतही विशीतल्या युवकाप्रमाणे कोरोना काळात लोकनेते गणेश नाईक नवी मुंबईकरांच्या आरोग्य सुविधेसाठी धावपळ करत होते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सतत दिघा ते बेलापुर आढावा घेत होते. जगाला हरविणारा, नामशेष करू पाहणारा कोरोना नवी मुंबईत मात्र आपला गाशा आता गुंडाळत आहे. लोकनेते गणेश नाईकांच्या कोरोना काळातील परिश्रमापुढे जणू काही शरणागती पत्करत आहे. कोरोना काळातील खराखुरा लढवय्या नवी मुंबईत जर कोणी असेल तर ते एकमेव नाव लोकनेते गणेश नाईकांचेच असेल. सत्तरी उलटूनही त्यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. प्रसिध्दीसाठी काम करू नका, जनतेसाठी काम करा, प्रसिध्दी तुमचा शोध घेत येईल हे लोकनेते गणेश नाईकांनी जगाला आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

:- संदीप खांडगेपाटील

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago