Support JaalglyaBharat.
Navimumbaillive.com@gmail.com: 9820096573
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून इच्छूक घटकांना तसेच प्रस्थापित घटकांना आता आचारसंहितेची व निवडणूक तारखा जाहिर होण्याची आतुरता लागली आहे. राजकीय क्षेत्रातील निवडणूक लढवू पाहणारा प्रत्येक जण ५ वर्षातील आपल्या मान-सन्मानाचा या निवडणूकीच्या माध्यमातून हिशोव चुकता करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. महापालिका निवडणूकांच्या तारखा अद्यापि जाहिर झाल्या नसल्या तरी सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांनी मात्र प्रस्थापितांना व इच्छुकांना सेवा देण्याच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरूवात केली आहे. सर्व्हे, डिजिटल प्रचार, व्हिडिओ, बॅनर, मतदारयाद्या, मतदार स्लीपा ही सेवा पुरविण्यासाठी या कंपन्या इच्छूकांकडून व प्रस्थापितांकडून दीड लाखापासून ते चार-साडेचार लाख रूपयांपर्यत पैसे आकारू लागल्या आहेत. ५ वर्षे जनसेवा करताना पैसा घालवायचा आणि आता या कंपन्यांनाही पोसायचे अशी कुजबुज निवडणूक लढवू पाहणाऱ्या मंडळींतून ऐकावयास मिळत आहे.
प्रस्थापित नगरसेवकांना तिकिट भाजपकडून तसेच महाविकास आघाडीतून जवळपास निश्चित झाले असल्याने इच्छूक घटकांकडून अजूनही पक्षांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडी तुटावी म्हणून मोठ्या प्रमाणावर इच्छूकांनी देव पाण्यात ठेवल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी तुटल्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकिट आणणे सोपे जाणार असल्याचे मातब्बर इच्छूकांकडून उघडपणे बोलले जात आहे. सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता असली तरी भाजपला सध्या गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक मातब्बर शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जावू लागले असून अनेकजण शिवसेना उपनेते विजय नाहटा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे व अशोक गावडेंच्या संपर्कात असल्याने आचारसंहिता लागल्यावर भाजपला अजून खिंडार पडणार असल्याचे पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे. भाजपला खिंडार पडत असले तरी दुसरीकडे मात्र भाजपचे तिकिट मिळावे यासाठी क्रिस्टलवर तसेच गौरव बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर राजकीय घटक चपला झिजवित असल्याने भाजपकडून निवडणूक लढवू पाहणाऱ्यांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे पहावयास मिळते.
उमेदवाराचा प्रचार साहित्याचा भार सर्व्हे कंपन्यांनी हलका केल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या सर्वच घटकांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर दिला आहे. अनेक भागात घरोघरी संपर्क अभियानही सुरू झाले आहे. आपल्याविरोधात उभा राहणाऱ्याची संभाव्य माहितीही काढून घेण्यावर अनेकांचा भर आहे. प्रचारादरम्यान समोरच्याला अडचणीत आणण्यासाठी कोणते मुद्दे वापरायचे, प्रस्थापित विकासकामावर भर देणार असल्याने त्याच विकासकामाचे तीनतेरा कशामुळे वाजले याचीही पुंगी वाजवण्याची तयारी विरोधकांकडून सुरू झाली आहे. अनेक भागात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नगरसेवक मंडळी पैसे खर्च करत असतानाच दुसरीकडे त्यांचे विरोधक मात्र ५ वर्षात विकासकामे करताना ठेकेदाराकडून मिळालेले १० ते १५ टक्केचा पैसा आता बाहेर काढले जात असल्याचे मतदारांना पटवून देत आहेत. निवडणूक तारखा जाहीर होण्याअगोदरच नवी मुंबईत प्रचाराचा पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान आतापासून धुराळा उडण्यास सुरूवात झाली आहे. अनेक राजकारण्यांची कोंडी करण्यासाठी बैठकाही सुरू असून विरोधी पक्षातील मातब्बर त्यांच्या प्रभागातील नाराजांना चुचकारतना पहावयास मिळत आहे.