मुंबई : सध्या
ठाणे महापालिकेत आरोग्य व इतर विभागात कंत्राटीतत्वावर कोव्हिड -१९प्रतिबंध अंर्तगत
सुरु असलेल्या भरती प्रक्रियेतील एक महिन्याचे वेतन जमा करण्याबाबत तुघलकी अट रद्द
करण्याविषयी ठाणे महापालिेकेला तातडीने आदेश देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील
यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेत सध्या
आरोग्य व इतर विभागासाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू आहे. २२ मे ते ३०
मे दरम्यान ही थेट मुलाखत प्रक्रिया आहे. या भरतीप्रक्रयेत इनटेनसिव्हीस्ट, ज्यु.
रेसिडेंट, वैद्यकिय अधिकारी, वैद्यकीय
अधिकारी (आयुर्वेदीक), आरोग्य निरीक्षक,
सिस्टर इनचार्ज, परिचारिका (जी.एन.एम), प्रसाविका (anm), औषध
निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी ऑपरेटर,
आया, वॉर्डबॉय/ परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध प्रवर्गासाठी कंत्राटी
तत्वावर ही भरती प्रक्रिया आहे. ही भरती कोव्हिड – १९ प्रतिबंध अंर्तगत होत असून केवळ सहा
महिन्याकरता अथवा कोरोनाचा प्रभाव संपेपर्यतच या भरतीमध्ये समाविष्ट झालेल्यांना
कामावर ठेवण्यात येणार आहे. कोरोना असल्याने
केवळ स्थानिक भागातील म्हणजेच ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील पात्र घटकांना
समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या पात्र उमेदवारांना
२० हजार रूपयांपासून दोन लाख रूपयांपर्यत त्या त्या पदानुसार वेतन देण्यात येणार
आहे. तथापि या भरतीप्रक्रियेत अटी व शर्तीमध्ये २४ क्रमांकामध्ये ‘निवड झालेल्या
उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वी एका महिन्याचे मानधन अमानत रक्कम म्हणून भरावे
लागेल व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही’ असे स्पष्टपणे नमूद केले असल्याचे
संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या
लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. मार्चच्या मध्यापासून आर्थिक परिस्थिती सर्वाचीच हलाखीची
झालेली आहे. संसाराचा गाडा हाकताना सर्वानाचा तारेवरची कसरत करावी लागत आहे. निवड
झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदासाठी वेतनश्रेणीनुसार २० हजारापासून ते दोन लाख
रूपयांपर्यत भरावे लागणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या
परिस्थितीत एक पगार भरायची तुघलकी अट लावण्यापूर्वी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा
विचार करणे आवश्यक होते. आज हजार-दोन हजाराला लोक महाग झाले आहेत. अनेकांचे एप्रिलचे
पगार झालेले नाहीत. व्यावसायिकांचे उद्योग बंद आहेत. पैशाची सर्वत्रच तंगी आहे.
त्यामुळे ठाणे महापालिकेने नोकर भरतीतील २४ क्रमाकांची तूघलकी अट तातडीने रद्द
करणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. जनता आज जेवणाला महाग झालेली असताना एक पगार
अनामत रकमेची अट योग्य नाही, ती अट तातडीने काढून टाकणे आवश्यक आहे. समस्या गंभीर
असल्याने आपण नोकर भरतीमधील एक महिन्याचे वेतन अनामत म्हणून जमा करण्याची तुघलकी
अट तातडीने काढून टाकण्याचे ठाणे महानगरपालिकेला आदेश तातडीने देण्याची मागणी
संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.